जुन्यातून सापडली नवी वाट

एखादी गोष्ट पुन्हा वापरणं ही गोष्टच आता कमी होत चाललीय. सरळ ‘जुने जाऊ द्या मरणालागून’ म्हणत नव्याची खरेदी होते. पण जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधल्या उर्मी पवारने मात्र जुनं ते सोनं म्हणत एक नवा प्रोजेक्ट हाती घेतलाय.

उर्वी आर्किटेक्चर करतेय. या विद्यार्थ्यांना वर्षभरात ब‍ऱ्याच कार्टरेज शीट्स वापराव्या लागतात. पण त्या एकाच बाजूने वापरलेल्या असतात. शैक्षणिक वर्ष संपल्यावर या शीट्स कच‍‍ऱ्यात किंवा रद्दीत दिल्या जातात. त्यातल्या ब‍ऱ्याचशा रिसायकल होऊन परत विकायला येतात. पण याच शीट्सचा वापर गरजू विद्यार्थ्यांसाठी केला तर? अशा कल्पना उर्वीच्या डोक्यात आली. मग तिने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तिने स्वतःच्या सगळ्या शीट्स चौपदरी दुमडून त्या एकामागोमाग एक लावल्या आणि त्याची एक कोरी वही बनवली. हे तिने तिच्या कॉलेजच्या ग्रूपमध्येही ‌दाखवलं आणि त्यांच्या सर्वांच्या वापरलेल्या शीट्सपासून अशा वह्या बनवायला घेतल्या. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. उर्वी फक्त आपल्याच ग्रूप आणि कॉलेजपर्यंत थांबली नाही. तर तिने भारती विद्यापीठमधल्या आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनाही ही कल्पना सांगितली. त्यांच्याकडूनही तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. मग या वह्या मोठ्या प्रमाणावर बनू लागल्या. साधारण ३० विद्यार्थ्यांच्या शीट्सपासून ३००च्या वर वह्या बनतात. या वह्यांचं वाटप उर्वी आणि तिच्या ग्रूपने ठाण्यातील एका शाळेत केलं. सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही आता ते या वह्यांचं वाटप करणार आहेत. या शीट्सपासून विद्यार्थ्यांनी फक्त वह्याच नव्हे तर वेगवेगळ्या आकाराच्या रंगीत कागदी पिशव्या, बॉक्सही बनवले आहेत. आता तर त्यांनी फेसबुकवर paper revitalized नावाचं पेजही बनवलेलं आहे. या पेजवरून उर्वी आणि तिचा ग्रूप जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आणि त्यासाठी योगदान देण्याचं आवाहन करत आहे.

पूनम पाटील, कॉलेज क्लब रिपोर्टर

Maharashtra Times मराठी बातम्या

Click the link below to view the complete article

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/waste-management-urvi-pawar/articleshow/48376868.cms